पुणे : उच्च माध्यमिक विद्यालयाची सुट्टी झाल्यानंतर घरी चाललेल्या कुसगाव (ता.भोर) येथील अकरावीतील विद्यार्थिनी रस्त्यातच अडवून विनयभंग करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला एक वर्ष सक्त मजुरी व १० हजार दंडाची शिक्षा पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठाविली आहे. हे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. जहागिरदार यांनी दिले आहेत.
भगवान ज्ञानोबा कचरे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आरोपी कचरे याचा साथीदार सुर्यकांत बाबुराव जानकर याला खाली कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन विद्यार्थिनीने राजगड पोलीस ठाण्यात एप्रिल २०१७ ला तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन विद्यार्थिनीनी शाळेतून घरी चालली होती. तेव्हा आरोपींनी मोटारसायकल रस्त्यात आडवी लावून अल्पवयीन मुलीला अडविले. त्यानंतर भगवान कचरे याने अल्पवयीन मुलीची ओढणी पकडली. आणि हात धरून विनयभंग केला. तसेच अल्पवयीन मुलीला व कुटुंबाला संपवुन टाकू अशी धमकी दिली. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील शिवाजीनगर सेशन न्यायालयात सुरु होता. सरकारी पक्षाच्या वतीने वकील सुचित्रा नरूटे यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी भगवान कचरे याला एक वर्ष शिक्षा, १० हजार रुपये दंड, कलम ३४१ नुसार ५०० रुपये दंड, तर कलम ५०६ नुसार तीन महिने शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. आरोपी सुर्यकांत जानकर याला खाली कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली आहे.
दरम्यान, सरकारी वकील सुचित्रा नरूटे यांना या खटल्यात राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे, सहाय्यक फौजदार विद्याधर निचित आणि मंगेश कुंभार यांची मदत मिळाली आहे.