पुणे : पुण्यात कोयता गॅंगची दहशत आणि वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वाहनांची तोडफोड करणारे आरोपी हे अल्पवयीन असल्याचं पोलिसांच्या तपासात आढळून आलं आहे, त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्यांची धिंडदेखील काढण्यात येणार आहे.
या प्रकरणाचा पहिला अध्याय चंदननगर परिसरात
चंदननगर परिसरात वाहनांची तोडफोट आणि जाळपोळ केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी धीरज दिलीप सपाटे याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांकडून गुन्हेगाराची चंदनगर परिसरात धिंड काढण्यात आली आहे. सपाटे आणि त्याच्या साथीदारांनी खराडी परिसरात महिन्याभरापुर्वी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. त्याच्या इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, धीरज सपाटे हा गेल्या महिन्याभरापासून फरार होता. त्याला चंदननगर पोलिसांनी अटक केली असून त्याची परिसरातून धिंड काढण्यात आली आहे.
या प्रकरणात अनेक अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याच समोर आलं आहे. त्यांना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी ठोस पावलं उचलायचा सुरुवात केली आहे. काही विशिष्ट भागात असे प्रकार घडत असल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे. या भागांवर पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे. परिसरात पेट्रोलिंग वाढवण्यात येणार आहे.