पुणे : पाळीव जनावरांची अवैधरित्या कत्तल करून बेकायदा मांस वाहतूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी जुन्नर शहरातील दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडून ६५० किलोग्रॅम वजनाचे गोमांस व मोटार असा ४ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. २०) पहाटे येथील पुणे नाशिक महामार्गावर मुक्ताई ढाब्याजवळ करण्यात आली.
चालक शहबाज मुक्तार कुरेशी (वय २७ ), कादिर मुस्तफा कुरेशी (वय ३४, दोघेही राहणार पणसुबा पेठ, जुन्नर, तालुका जुन्नर), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावी आहेत. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा प्रताप माने यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शुक्रवारी (ता. २०) पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास येथील पुणे- नाशिक महामार्गवर मुक्ताई ढाब्याजवळ इंडियन पेट्रोल पंप शेजारी असलेले पंचर दुकानासमोर संशयित मोटारीची तपासणी पोलिसांनी केली असता मोटारीत ९७ हजार ५०० रुपये किंमतीचे ६५० किलोग्रॅम वजनाचे गोमांस आढळून आले.
दरम्यान, पाळीव जनावरांची अवैधरित्या कत्तल करून बेकायदा गोमांस वाहतूक केल्या प्रकरणी पोलिसांनी मांस व मोटार असा असा ४ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.