पुणे : भारतरत्न व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भाजपचे नेते सुनिल देवधर (वय ५८, रा. नारायण पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मिडिया एक्सवरून (ट्विटर) विरोधात आक्षेपार्ह मजकूर पत्रकार निखिल वागळे यांनी केले होते. त्यामुळे अडवाणी यांना मानणार्या असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून समाजात एकोपा राहण्यास बाधा निर्माण केली आहे. तसेच सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारी पोस्ट जाणिवपूर्वक प्रसारित करुन त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याकरीता बदनामी करुन अवहेलना केली.
तसेच निखील वागळे यांनी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून अडवाणी, मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा देखील अपमान केला आहे, असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते पुढील कारवाई करतील, अशी आशा आहे. तसेच चिथावळीखोर वागळे यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी सुनिल देवधर यांनी केली आहे.