पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहेत. त्यांची जयंती पूर्ण भारतात थाटामाटात साजरी होते. बाईक रॅली, आरोग्य शिबिरे, गडकिल्ले संवर्धन या सारख्या उपक्रमांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती साजरी झाली. मात्र दुसरीकडे ठाण्यातील कळवा परिसरात काही तरुणांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही घोषणा दिल्याने चक्क गुन्हा दाखल केल्याचा प्रताप कळवा पोलिसांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवजयंतीच्या दिवशी कळव्यातील जयभीम नगर ते कळवा नाक्यापर्यंत तुळशीराम साळवे, भिमा साळवे या तरुणांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या रॅली दरम्यान त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणा देखील दिल्या. त्यांनी दिलेल्या घोषणा आणि बाईक रॅली काढणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. कारण, कळवा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
कळवा पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, विनापरवाना बाईक रॅली काढणे, आणि यादरम्यान घोषणा देणे, अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात कोणताही पोलीस अधिकारी प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. त्यामुळे या विषयावर सारवासारव करण्याची वेळ कळवा पोलिसांवर आली आहे.
राजकीय सभा असो की कोणताही कार्यक्रम असो छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्याच जातात. त्यात शिवजयंती उत्सव म्हणजे राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून निघतो. ज्योतरॅली काढली जाते, बाईकरॅली काढली जाते, अनेक मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी तर थेट आग्राच्या लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करुन महाराजांना एक आगळी वेगळी मानवंदना दिली गेली. पण यांच वेळेस ठाण्यातील कळवा शहरात मात्र ” छत्रपती शिवाजी महाराज की जय” घोषणा दिल्या म्हणून थेट गुन्हा दाखल कळवा पोलिसांनी केला आहे.
या घटनेबद्दल नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपतींच्या राज्यात महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा द्यायच्या नाहीत का ? अशी चर्चा आता मात्र परिसरात रंगली आहे.