पुणे : ट्रस्टच्या जागेचे अकृषक प्रमाणपत्र (एनए) करण्यासाठी ४२ लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिरूर येथील तत्कालीन तहसीलदार, महसूल सहाय्यक, तलाठी व खाजगी इसमांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करताना बंडगार्डन पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.२८) गुन्हा दाखल केला आहे.
रंजना उमेश उमरहांडे (तत्कालीन तहसीलदार, शिरूर (वर्ग-९)), स्वाती सुभाष शिंदे (महसूल सहाय्यक, तहसिलदार कार्यालय शिरूर), सरफराज तुराब देशमुख (तलाठी, मौजे शिरूर) अतुल घाडगे आणि निंबाळकर असे दोन इसमांवर लाच मागितल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ४८ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या ट्रस्टच्या जागेचे अकृषक प्रमाणपत्राचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी व वरिष्ठ कार्यालयातून मंजूरी आणण्यासाठी आरोपी तलाठी देशमुख यांनी स्वतः साठी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ४२ लाख रुपयांची लाच मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता, सदर कामामध्ये मदत करण्यासाठी आरोपी स्वाती शिंदे यांनी १ लाख रुपयांची लाच मागणी केली. तसेच जागेचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी व जिल्हाधिकारी कार्यालयात मदत करण्यासाठी आरोपी तहसीलदार रंजना उमरहांडे यांना ५ लाख रूपयांची लाचेची मागणी केली.
त्यानंतर खाजगी इसम अतुल घाडगे आणि निंबाळकर यांनी सदरच्या प्रस्तावाची जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजूरी मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी २० लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच यातील सर्व आरोपांनी लाच मागणीस सह्या करून प्रोत्साहन दिले. म्हणून वरील पाचही आरोपी दोषी आढळल्याने त्यांच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी तलाठी देशमुख याला तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक विरनाथ माने करीत आहेत. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज मुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.