पुणे : गुन्हयाचे चार्टसिटमध्ये मदत करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून दोघांवर गुरुवारी (ता.२०) गुन्हा दाखल केला आहे.
हर्षदा बाळासाहेब दगडे (पद- सहायक पोलीस निरीक्षक) आणि अभिजीत विठ्ठल पालके (पद- पोलीस शिपाई. दोघांचीही नेमणूक – कोंढवा पोलीस ठाणे) असे कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांवर दाखल असलेल्या गुन्हयाचे चार्टसिटमध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांची आई, वडील व बहीण यांना अटक न करण्यासाठी आरोपी सहायक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे व अभिजीत पालके यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खातीरजमा केला असता, तक्रारदार यांना पोलीस शिपाई अभिजीत पालके यांनी ५० हजार रुपयांची लाच मागणी केली व ती लाच मागणीस सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे यानी सहाय्य केले असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी दोघांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.
हि कारवाई अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.