पुणे : रस्त्यात कार पार्क करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी वाद घालून उपनिरीक्षकाच्या वर्दीला हात घालणार्या कार चालकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.
अभिनंदन सखाराम गायकवाड (वय ३७, रा. कुमार प्रायम व्हेरा, साईनाथनगर, वडगाव शेरी) असे अटक केलेल्या कार चालकाचे नाव आहे. ही घटना विमाननगर येथील खालसा डेअरीसमोरील रोडवर शनिवारी रात्री पावणे आठ वाजता घडली.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे हे वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी अभिनंदन गायकवाड यांनी त्यांची पांढर्या रंगाची कार रस्त्यामध्ये पार्क करुन थांबले होते.
गायकवाड यांना कार काढून घेण्यास सांगितले. तेव्हा ते वाद घालू लागले. हे पाहून फिर्यादी हे गायकवाड याला समजावून वाद न करता गाडी काढून घेण्याबाबत सांगत होते.तेव्हा गायकवाड याने फिर्यादींना तुला माझीच गाडी दिसली का इतर गाड्या दिसत नाहीत का असे बोलल्यानंतर फिर्यादीने ट्रॅफिक जाम आहे़ गाडी काढ्न घ्या, असे सांगितले.
त्यावर आरोपीने मी गाडी काढणार नाही. काय करायचे ते करा, मी तुमच्याकडे बघून घेतो, असे म्हणून फिर्यादीसोबत झटापटी करुन सरकारी वर्दीची कॉलर ओढली.
पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन गायकवाड याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाकडे करीत आहेत.