पुणे : ऑनलाईन रेल्वेचे तिकीट कॅन्सल करणे एका ६९ वर्षाच्या जेष्ठाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी तब्बल साडेतीन लाखावर डल्ला मारला आहे. तिकीट रद्द करण्यासाठी जेष्ठाने गुगलवर आरआरसीटीसीची वेबसाईट उघडल्यानंतर ही फसवणूक झाली आहे.
याप्रकरणी औंधमधील एका ६९ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २३ जानेवारी २०२३ रोजी घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी यांनी रेल्वेचे तिकीट रेल्वेच्या आयआरसीटीसीवरुन बुक केले होते. परंतु, त्यांचा प्रवास काही कारणास्तव रद्द झाला. त्यामुळे त्यांनी रेल्वेचे तिकीट कॅन्सल करण्यासाठी मोबाईलवरुन गुगलवर सर्च केले. तेव्हा त्यांना आयआरसीटीसीच्या अनेक साईट आढळून आल्या. त्यापैकी एक साईट त्यांनी उघडली. ती नेमकी सायबर चोरट्यांची होती. त्यांनी साईट उघडताच त्यांना सायबर चोरट्यांचा फोन आला.
त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडून पीएनआयआर नंबर घेतला. त्यांच्या तिकीटांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी तिकीट कॅन्सल करायचे असल्याचे सांगितल्यावर त्यांना एक लिंक पाठवून ती भरुन पाठवा, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी फॉर्म भरुन पाठविला. तेव्हा त्यांना तुमचे पैसे खात्यात जमा झाले आहेत, तपासून पहा, असे सांगितले. तेव्हा त्यांनी बँक खाते तपासले असता खात्यात पैसे जमा झाले नव्हते.
तेव्हा सायबर चोरट्याने त्यांना नेट स्लो असल्याने कदाचित काही वेळात पैसे जमा होतील, असे सांगितले.
दरम्यान,त्यांना स्टेट बँकेतून फोन आला, तुम्ही १ लाख रुपयांचे व्यवहार केले आहेत का अशी चौकशी केली.त्यांनी नाही असे सांगितले. तेव्हा बँक कर्मचार्याने हा सायबर फ्रॉड असून तुमचे इंटरनेट बँकिंग बंद करतो.तुम्ही बँकेत तक्रार करा. तोपर्यंत सायबर चोरट्यांनी त्यांच्या ३ खात्यातून ३ लाख ४४ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली होती. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.