पुणे : मांजरी बुद्रुक येथील एका ५१ वर्षीय महिलेची सहा लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कस्टम विभागातून बोलत असल्याचे भासवून विदेशातील गिफ्ट आल्याचे सांगून महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना २६ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नेहा शर्मा या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गृहिणी असून, त्या महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीसोबत ओळख झाली. त्या व्यक्तीने भारतात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवली आणि फिर्यादी महिलेसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर मैत्री झाल्यानंतर विदेशातून ज्वेलरी व परदेशी चलनाचे पार्सल पाठविल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर नेहा शर्मा नावाच्या एका महिलेने फिर्यादी महिलेला फोन करून ती कस्टम विभागातून बोलत आहे असे सागून, तुमचे विदेशातून पार्सल आल्याचे सांगितले. ते पार्सल सोडवून घेण्यासाठी क्लिअरन्स, जीएसटी मनी लाँडरींग अशी विविध कारणे सांगून फिर्यादींना पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादी महिलेने त्यांचे वेळोवेळी विविध बँक खात्यांवर ६ लाख ६० हजार रुपये पाठवून दिले.
दरम्यान, काही कालावधी गेल्यानंतरदेखील महिलेला कोणत्याही प्रकारचे गिफ्ट आले नाही आणि भरलेले पैसे परत मिळाले नाहीत. त्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.