बार्शी : शेकडो लग्नाळू तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून, मेळाव्यात वधू किंवा वर न दाखवून हजारो रुपयांची फी घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना बार्शी शहरात उघडकीस घडली आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी कथित वधू वर मंडळ चालक, महिला आणि एजंटासह १२ जणांना ताब्यात घेतले आहे.
लग्नाळू तरुण आणि पालकांनी संताप व्यक्त करत बार्शी शहर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी शहरातील एका मंगल कार्यालयात सुशिक्षित तरुणांचा वधू वर पालक परिचय मेळावा आयोजित केला होता. सदर बार्शी शहरात वधू वर मंडळाकडून तिसरा मेळावा घेण्यात आला होता. मात्र, मेळाव्यात लग्नाळू तरुणांना वधूच दाखवण्यात आली नाही.
पालक व तरुण आज या ठिकाणी मुलगी दाखवली जाईल. तसेच मुलगी पसंत पडताच लगेच लग्न लावून दिले जाईल, असे आश्वासन दिले जात होते. यासाठी लग्नाळू तरुण तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून रजिस्ट्रेशन फी म्हणून प्रत्येकी हजार रुपये व डिपॉझिट म्हणून तीन ते दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याची बाबदेखील समोर आली आहे.
आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर लग्नाळू तरुण, कुटुंबीय, नातेवाईक बार्शी पोलीस ठाण्यात पोचले. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला. यात लग्नाळू मुलांच्या आई-वडिलांकडून लग्न जुळवण्यासाठी पैसे घेतल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे कथित वधू-वर मंडळाचे बनावट रॅकेट उघड झाले.
पोलिसांनी वधू-वर मंडळ चालक, महिला, एजंटला ताब्यात घेतले आहेत. पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती. फसवणूक झालेल्या पालकांचे जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
दरम्यान, हे वधू वर सूचक मंडळ नोंदणीकृत नाही. तसेच या मंडळाने आजपर्यंत एकही लग्न लावून दिलेले नाही. केवळ आश्वासने दिली. पोलिसांच्या वधू-वर मंडळ चालक असलेल्या महिलेच्या बोलण्यावरून दिसून आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर बोगस वधू-वर सूचक मंडळाचे बिंग फुटले.