पुणे : प्रेमसंबंध तोडल्यानंतर तरुणीचा विनयभंग करून तिच्या आईच्या पोटात लाथ मारुन जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना आंबेगाव पठार येथील हॉटेल प्यासा येथे रविवारी (ता.१९ ) मध्यरात्री घडली आहे.
याप्रकरणी आंबेगाव पठार येथील एका १९ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार समर्थ परदेशी (रा. गणेशनगर, आंबेगाव पठार) व त्यांच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी समर्थ यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु तीन महिन्यांपासून फिर्यादी या आरोपी समर्थ याच्यासोबत बोलणे बंद केले होते. याचा राग मनात धरून आरोपी तिचा पाठलाग करत होता. फिर्यादी या रात्री घरासमोर पाणी भरत असताना आरोपी मित्रांसोबत तेथे आला. फिर्यादीला ‘तू मला पाहिजे, तू मला खूप आवडतेस’ असे म्हणून फिर्यादीचा हात पकडून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले.
त्यानंतर फिर्यादी तरुणीने आरडाओरडा केला असता ते ऐकून फिर्यादीची आई व भाऊ आले. त्यांना आरोपी समर्थ याने शिवीगाळ करुन आईच्या पोटात लाथ मारली. तरुणीच्या आईला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तसेच या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी समर्थ परेदशीसह त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.