सोलापूर : प्रियकरासोबत अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने प्लॅन तयार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे बुधवारी (ता. २१) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यासाठी दोघांनी झोपेच्या गोळ्या, दोरी आणि चाकूची खरेदी केली होती. गुन्हे शाखेच्या तपास पथकाच्या पोलिसांनी खूनाची माहिती काढून संशयित आरोपीला अटक केली आहे.
दशरथ नागनाथ नारायणकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर बाबासाहेब जालिंदर बाळशंकर असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पत्नीनेच सोलापूर एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबरजवळगे (ता. अक्कलकोट) येथील दशरथ नागनाथ नारायणकर हा आपल्या पत्नीसोबत काही वर्षांपूर्वी सोलापुरात राहायला आला होता. त्याच्या पत्नीचे बाबासाहेब जालिंदर बाळशंकर या तरूणासोबत सात-आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. खून झाल्यानंतर सुरवातीला आर्थिक व्यवहारातून दशरथचा खून झाल्याचा पोलिसांना संशय होता. पण, पहाटेच्या सुमारास झालेला खून आणि पत्नीच्या जबाबावरून पोलिसांना वेगळचा संशय आला. तत्पूर्वी, पतीच्या खूनाची फिर्याद पत्नी नारायणकर हिनेच स्वत: एमआयडीसी पोलिसांत दिली होती.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भेट दिल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या बाजूंनी तपास सुरु केला. आजूबाजूला चौकशी केल्यानंतर पोलिसांना घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी बाबासाहेब बाळशंकर हा त्याठिकाणी आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या क्रमांकावर कॉल केला, पण त्याचा मोबाइल बंद होता. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला.
दरम्यान, बाबासाहेब बाळशंकर याला मुळेगाव क्रॉस रोडवरून रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याने अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबातून दोघांनी मिळून खून झाल्याचे उघड झाले आहे.