शिक्रापूर : एका व्यवसायिकाने खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे घडली आहे. किरण सुरेश कुलकर्णी (वय-४८, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरुर, जि. पुणे) असे भिमा नदीच्या पाण्यात आत्महत्या केल्याल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत महेश सुरेश कुलकर्णी (वय-४४, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात तब्बल ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनाथ भंडारे, संतोष भंडारे, संदीप अरगडे तिघे (रा. वढू बुद्रुक, ता. शिरुर जि. पुणे), सुधाकर कांतीलाल ढेरंगे, कांतीलाल रामचंद्र ढेरंगे, अमोल गव्हाणे तिघे (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरुर जि. पुणे), शांताराम सावंत (रा. वाडागाव, ता. शिरुर, जि. पुणे), अजय यादव, जनार्धन वाळूंज (रा. लोणीकंद, ता. हवेली जि. पुणे), जातेगाव खुर्दचे माजी सरपंच किशोर खळदकर (रा. जातेगाव खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे), मामा सातव (रा. वाघोली, ता. हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथील किराणा व्यवसायिक किरण कुलकर्णी यांचा वैष्णवी सुपर मार्केट नावाने व्यवसाय आहे. कोरोना काळात व्यवसाय अडचणीत आल्यानंतर किरण कुलकर्णी यांनी काही खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. तसेच किरण यांनी गावातील सुधाकर ढेरंगे व कांतीलाल ढेरंगे यांच्यासोबत भागीदारीत इमारत बांधलेली होती. बरेच दिवस खाजगी सावकारांना व्याज दिल्याने किरण अडचणीत आल्याने त्यांनी ढेरंगे यांच्या सोबत भागीदारीत असलेली सदनिका व गाळा विक्रीचा निर्णय घेतला.
दरम्यान, सदनिका व गाळा खरेदीसाठी व्यक्ती आल्यास ढेरंगे त्यांना सदर इमारत घेऊ देत नसून झालेला व्यवहार मोडत होते. मात्र, ज्या खाजगी सावकारांकडून किरण यांनी पैसे घेतले ते सर्व जण त्यांना मानसिक त्रास देत दमदाटी करत असे. या त्रासाला कंटाळून किरण कुलकर्णी यांनी आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहे.