दिनेश सोनवणे
दौंड : शहरातील शिवराजनगर येथे दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत १ लाख ३४ हजार रूपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील तरूणांना चोरटे आल्याची माहिती मिळताच त्यांनी पाठलाग केला परंतु अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले.
माजी नगरसेवक जीवराज पवार यांनी त्यांच्याकडील रायफल मधून पाठलाग करीत तीन वेळा हवेत गोळीबार केला. परंतु चोरटे सापडू शकले नाही. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात चार चोरटे दिसून आले आहेत.
शिवराजनगर येथे राहणारे शिक्षक संतोष हरिश्चंद्र चव्हाण यांच्या बंद बंगल्यात मध्यरात्री दोननंतर चोरी झाली. चोरट्यांनी त्यांच्या घरातील लोखंडी संरक्षक दाराचे कडी – कोयंडे व कुलूप तोडून आत प्रवेश केला.
आतील कपाटांमधील ड्रॅावरचे कुलूप तोडून त्यातील सोन्याचा दीड तोळ्याचे गंठण चोरण्यात आले. त्याचबरोबर स्नानगृहात साबणाच्या रिकाम्या पु्ड्यात ठेवलेले रोख पन्नास हजार रूपये देखील चोरण्यात आले.
तसेच संतोष चव्हाण यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरूनाथ हितनाळे यांच्या बंगल्यात देखील घरफोडी करण्यात आली. त्यांचे भाडेकरू व महावितरणमधील वायरमन संतोष पोपट काकडे यांच्या बंद घरात प्रवेश करून चोरट्यांनी रोख रक्कम आणि चांदीचे शिक्के चोरून नेले आहेत.