शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे गावाच्या हद्दीतील शिक्षक भवन कॉलनी येथे घरात कुणीच नसल्याचा फायदा अज्ञान चोरट्यांनी घेताना रोख रकमेसह तब्बल १७ लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी संग्राम सुदाम घुमे (वय-४० रा. शिक्षक भवन कॉलनी, तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम घुमे हे शुक्रवारी (ता.२०) त्यांच्या वैयक्तिक कामानिनित्त त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते. घुमे यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना शनिवारी (ता.२१) शेजारी घराच्या दरवाजाचे कुलूप तुटल्याचे दिसून आले. त्यानंतर शेजाऱ्यांनी ही बाब तातडीने घुमे यांना सांगितली.
घुमे यांना ही माहिती समजतात घुमे तातडीने घरी आले. घरात जाऊन पाहिले असता, त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. त्यांनी कपाट उघडून पहिले असता, कपाटातील ३० तोळे सोन्याचे दागिने, देवाची चांदीची मूर्ती आणि ३० हजार रुपये निदर्शनास आले नाहीत.
दरम्यान, संग्राम घुमे यांना आपल्या घरातील रोख रकमेसह १७ लाख रुपयांच्या दागिन्यांची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे व पोलीस नाईक अमोल नलगे हे करत आहेत.