पिंपरी : रागाने माहेरी गेलेल्या बायकोला परत माघारी आणण्यासाठी गेलेल्या दाजीला मेहुण्याने शिवीगाळ करून कोयत्याने हल्ला केल्याची घटना दापोडी (पुणे) येथील सिद्धार्थनगर येथे रविवारी (ता. १९) घडली आहे. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागनाथ शंकर कांबळे (५०) राकेश नाथनाथ कांबळे (२१, दोघे रा. दापोडी) असे गुन्हा दाखल करण्यात आल्रेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सचिन एकनाथ वाघमारे (वय ३२, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाघमारे आणि त्यांची पत्नी या दोघांमध्ये घरगुती कारणांवरून सारखे वाद होत होते. एके दिवशी फिर्यादी वाघमारे यांच्या पत्नीने स्वयंपाक केला नाही म्हणून वाघमारे यांनी पत्नीला मारहाण केली. त्या रागाने नागनाथ यांची पत्नी माहेरी निघून गेल्या होत्या.
दरम्यान, फिर्यादी सचिन वाघमारे हे पत्नीला आणण्यासाठी दापोडी (पुणे) येथील सिद्धार्थनगर येथे रविवारी (ता. १९) गेले होते. तेव्हा वरील दोन्ही आरोपींनी वाघमारे यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ का करता याची सचिन वाघमारे यांनी विचारण केली असता, आरोपींनी हाताने मारहाण करून वाघमारे यांच्या डोक्यात कोयता मारून जखमी केले. असे सचिन वाघमारे यांनी फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी सचिन वाघमारे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागनाथ कांबळे व राकेश कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.