Bribe पुणे : खडकाळे-कामशेत (ता. मावळ, जि. पुणे) येथील ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज गुरुवारी (ता.१३) रंगेहाथ पकडले आहे. पत्र्याचे शेडची नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
विलास तुकाराम काळे (वय ४६, ग्रामविकास अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका २८ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार…!
तक्रारदार यांनी त्यांचे आईचे नावावर खरेदी केलेल्या जागेवर पत्र्याचे शेडची नोंद ग्रामपंचायत खडकाळे कामशेत येथे करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी लोकसेवक विलास काळे यांची भेट घेतली. तेव्हा लोकसेवक विलास काळे यांनी ८ अ उता-यावर नोंद करण्यासाठी १२ हजार रुपयांच्या लाचेची तक्रारदार यांच्याकडे केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, तक्रारदार यांच्या आईचे नावे नोंद करून देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी विलास काळे यांनी तक्रारदार यांच्याकडे १२ हजार रुपयांची मागणी करून त्यातील १० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काळे यांना रंगेहाथ पकडले. आरोपी विलास काळे यांच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत..