Breaking News माजलगाव, (बीड) : उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड आतिकच्या खुनाचा निषेध करत बीडमध्ये त्याला शहीद ठरवणारे पोस्टर लागल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
बीड जिल्ह्यातील माजलगावातील एका चौकात अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांचे समर्थन करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. अहमद बंधूंच्या हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. मोहसीन भैय्या पटेल मित्र परिवारानं हे पोस्टर लावले आहेत. लोकाशा नावाच्या वर्तमानपत्रात आतिक अहमदच्या हत्येसंदर्भात आलेली बातमीही पोस्टरवर लावण्यात आली आहे. ‘मर्डर ऑफ आतिक, डेथ ऑफ डेमॉक्रॅसी’ अशा मथळ्याखाली ही बातमी आहे.
चौकात हे पोस्टर लागलेले दिसताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं होतं. पोलिसांना याची माहिती मिळताच हे पोस्टर तातडीनं हटवण्यात आले. तसंच, या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. या मंडळाचा आतिक अहमदच्या टोळीशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे.
आतिक व अश्रफची १५ एप्रिलच्या रात्री कोल्विन हॉस्पिटलच्या आवारात पोलिसांच्या डोळ्यांदेखत हत्या करण्यात आली होती. सनी सिंग, लवलेश आणि अरुण मौर्य नावाच्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. उमेश पाल खून प्रकरणात आतिक व अश्रफ हे दोघे तुरुंगात होते.
दरम्यान, आतिक अहमदवर १०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याचं संपूर्ण कुटुंबच गुन्हेगारी कारवायांमध्ये होतं. त्याचा एक मुलगा असद काही दिवसांपूर्वीच पोलीस चकमकीत मारला गेला आहे. तर, पत्नी आयशा फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.