Breaking news | पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे हॉल तिकीट लीक झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
एमपीएससीकडून गट क ची परीक्षा 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. ही अवघ्या सात दिवसांवर आली आहे. त्या परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना एमपीएससीने उपलब्ध केले आहे. मात्र हे हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याची माहिती समोर आहे.
त्यामुळे विद्यार्थ्याची वयक्तिक माहिती व्हायरल झाली आहे. तसचे हाॅकर्सने पूर्व परीक्षेचा पेपर देखील उपलब्ध झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली असून तणावाचे वातावरण दिसून येत आहे.
आता परीक्षा होणार का अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये रंगली आहे.
एमपीएससीचा खुलासा….परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार …..
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल , २०२३ रोजी नियोजित आहे.परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली होती.
यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिध्द होत असल्याची बाब आज रोजी निदर्शनास आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे
– चॅनेलवर प्रसिध्द झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य विदा ( डेटा ) लिक झालेला नाही, याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसेच सदर चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक विदा उपलब्ध असल्याचा, तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून अशाप्रकारे कोणताही विदा अथवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नाही.
– आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
– प्रवेशप्रमाणपत्रे लिक करणाऱ्या चॅनेलच्या अॅडमिनविरुध्द सायबर पोलीसांकडे तक्रार देण्यात आलेली असून प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
– प्रस्तुत प्रसिध्दीपत्रकाद्वारे उमेदवारांना आश्वस्त करण्यात येते की , पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच विषयांकित परीक्षेचे आयोजन करण्यात येईल .
परीक्षा देण्यास विद्यार्थी तयार, पण….
हाॅल तिकीट लिक झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण दिसून येत आहे. अवघ्या सात दिवसांवर परीक्षा आल्याने विद्यार्थी अभ्यासाच्या अंतिम रिव्हिजन मध्ये व्यस्तआहेत. मात्र अशी खळबळजनक माहिती समोर आल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित झाले आहे. टेलिग्रामवर केलेल्या दाव्यामुळे परीक्षा खरच पारदर्शक पणे पार पडेल का असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. हे प्रकरण गंभीर असून परीक्षा पुढे ढकलण्यात यावी असेही काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.