पुणे : माओवादी संघटनेचा सदस्य अरुण भानुदास भेलके (वय-४६) याला बेकायदा कृती (संरक्षण) कायदा अर्थात यूएपीए कलम २० अंतर्गत बंदी घातलेल्या सीपीआयचा सदस्य असल्याबद्दल दोषी ठरवून ८ वर्षांची ठोठाविली आहे. हे आदेश शिक्षा विशेष एटीएस न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने बुधवारी (ता.१४) सुनावली आहे.
देशभक्ती युवा मंचाच्या माध्यमातून नक्षलवादी कारवाया करणारा नलक्षलवादी नेता अरुण भानुदास भेलके उर्फ शरमन जाथय़ उर्फ संजय कांबळे उर्फ राजन उर्फ संघर्ष उर्फ आनंद याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटने कासेवाडी झोपडपट्टी येथून अटक केली होती.
तो संजय कांबळे या नावाने पुण्यात राहत होता. त्याच्यासह पत्नी कांचन हिलाही पोलिसांनी अटक केली. पुण्यातील मास मूव्हमेंट नावाच्या संघटनेच्या संपर्कात राहून या तरुणांना ‘अर्बन नक्षलवादा’साठी तयार करण्याचे काम तो करीत होता.
चंद्रपूर पोलिसांनी २००८ नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईत दहा जणांना अटक केली होती. त्यावेळी चीनी बनावटीचे एक कार्बाईन गन व १३० काडतुसे पोलिसांनी जप्त केली होती. अटक केलेल्या दहा मध्ये अरुण भेलके व त्याची पत्नी कांचन यांचाही समावेश होता.
जामीन मिळाल्यापासून हे दोघेही फरार होते. भेलके हा नाव बदलून पुण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुणे एटीएसच्या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला कासेवाडी भागातून सापळा रचून अटक केली.
दरम्यान, मुख्य शिक्षेव्यतिरिक्त, न्यायालयाने अरुण भेलके याला UAPA कलम ३८ अन्वये आणि फसवणूक, बनावट कागदपत्रे वापरणे इत्यादी गुन्ह्यांसाठी सात ते पाच वर्षांपर्यंतची शिक्षा व ४२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या सर्व शिक्षा एकाचवेळी ठोठावल्या जाणार आहेत. भेलके अटक झाल्यापासून येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. सरकारी वकील म्हणून अॅड. उज्जवला पवार यांनी कामकाज पाहिले.
ही कारवाई तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त आणि त्यावेळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, पोलिस अधिकारी सुनिल तांबे, बाळकृष्ण कुतवळ, सहायक निरीक्षक सुमेध खोपीकर, नागेश भास्कर, राहूल राख, अश्विनी जगताप, जोगळेकर, पोलीस कर्मचारी सुनिल पवार, शंकर संपते, आप्पा गायकवाड, बाळासाहेब बारगुजे, दिनेश गडांकुश, मुकुंद देवडे यांच्या पथकाने केली होती.