ब्रेकिंग न्यूज | वृत्तसंस्था : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रयागराज पोलीस दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात असताना वाटेत हा गोळीबार झाला, त्यात दोन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलत असतानाच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ते नेमके काय बोलत होते. अतिकच्या थेट डोक्यात गोळी मारली, पुढे अशरफलाही गोळी लागली. हे सगळे कॅमेऱ्यासमोर घडल्याने ही घटना रेकॉर्ड झाली.
या गोळीबारानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. गोळीबारानंतर घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून ज्यामध्ये दोन्ही भावांचे मृतदेह जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसत आहेत.
हे होते शेवटते शब्द…
माध्यम प्रतिनिधींनी अतिकला विचारलं की, तुम्हाला अंत्ययात्रेत नेलं नाही, याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? अतिक म्हणाला,”आम्हाला नेलं नाही. पण मुख्य गोष्ट ही आहे की…” एवढं बोलताच या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अतिक अहमद याचा मुलगा असद याचंही दोन दिवसांपूर्वी एन्काऊंटर करण्यात आलं होतं. त्याचे अंत्यसंस्कार कडक पोलिस बंदोबस्तात पार पडले. या अंत्यसंस्काराला केवळ २५ लोक उपस्थित होते, तसंच ड्रोनद्वारे यावर नजर ठेवण्यात आली होती.