पुणे : बेकरीतून विकत घेतलेला पाव खराब झाल्याने परत करण्यासाठी गेलेल्या एका लहान मुलाला बेकरी चालकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील भवानी पेठेत नुकतीच घडली आहे. याप्रकरणी बेकरी चालकासह तिघांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खालीद सिद्दीक अन्सारी (वय ५३), फैजान खालीद अन्सारी (वय २९), जैद खालीद अन्सारी (वय २४, तिघे रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावेआहेत. याप्रकरणी संदीप जयप्रकाश पांडे (वय ३८, रा. भवानी पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पांडे यांनी मुलाला बेकरीतून पाव आणण्यास सांगितले होते. त्यानुसार मुलगा बेकरीतून पाव घेऊन आला होता. मात्र पाव आंबट लागल्याने मुलाला पाव परत करण्यास पांडे यांनी पाठविले.
दरम्यान, मुलगा पाव माघारी देण्यासाठी बेकरीत गेला असता, वरील आरोपींनी मुलाला शिवीगाळ करुन बॅटने बेदम मारहाण केली. व त्याच्याकडील मोबाइल संच अन्सारीने फेकून दिला.
त्यानंतर संदीप पांडे यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे करत आहेत.