पुणे : वन विभागात नोकरी लावतो म्हणून साताऱ्यातील तरुणांची ११ लाखांची फसवणूक करणाऱ्याला बोरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
राजेश नंदकुमार शिंदे (रा.बोरगाव, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गणेश कृष्णा चव्हाण (वय.२९, रा. सदरबझार, सातारा) असे फिर्याद दिलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी चव्हाण याला कराड येथे वनपाल म्हणून नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून राजेश नंदकुमार शिंदे याने साडेतीन लाख रुपये घेतले. गणेश चव्हाण यांच्याप्रमाणेच इतर चार तरुणांनाही अशाच पद्धतीने आमिष दाखवून त्यांच्याकडून शिंदे याने पैसे उकळले.
दरम्यान, याप्रकणी तरुणांची एकूण ११ लाखांची फसवणूक झाली होती. हा प्रकार दीड वर्षापूर्वी घडला होता. संबंधित तरुणांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेश शिंदे हा फरार झाला होता.
त्यानंतर बोरगाव पोलिसांनी राजेश शिंदे याला त्याच्या घरातून त्याला बेड्या ठोकल्या असून बोरगाव पोलिसांनी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.