बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीच्या यल्लमा देवी दर्शनासाठी जाणाऱ्या वाहनाचा अपघात होऊन ६ जण मृत्युमुखी पडल्याची घटना रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर गावातील विठ्ठल देवस्थानच्या जवळ बुधवारी मध्यरात्री घडली. यात पाच जण जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अपघातातील भाविक पिकअप वाहानातून प्रवास करत होते. नागमोडी वळणाच्या रस्त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी वडाच्या झाडाला धडकल्याने हा अपघात झाला. यात हनुमाव्वा (वय २५ वर्षे), दीपा (वय ३१ वर्षे), सविता (वय १७ वर्षे), सुप्रीता (वय ११ वर्षे) , मारुती (वय ४२ वर्षे), इंदिरव्वा (वय २४ वर्षे) हे मृत्युमुखी पडलेले भाविक रामदुर्ग तालुक्यातील हुल कंद गावाचे रहिवासी होते.
अपघातग्रस्त गाडीतून २३ जण प्रवास करत होते. अपघात एवढा भीषण होता, की यात पाच भाविक जागेवरच मृत्युमुखी पडले तर एकाचा उपचार करताना मृत्यू झाला. सर्व भाविक सौंदत्ती हुल कुंद गावातून दर्शनासाठी यल्लम्मा देवीच्या मंदिराकडे जात असताना ही घटना घडली. अपघातानंतर पोलीस अधीक्षक डॉ . संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
भाविक गाडीत बसले आणि काही मिनिटातच अपघात
भाविक यलम्मा देवीच्या दर्शनासाठी पायी निघाले होते. त्यावेळी संबंधित वाहन चालकाने भाविकांना जाताना पाहिले व गाडी थांबवत भाविकांना मंदिरापर्यंत सोडतो असे सांगितले. यामुळे सर्वच भाविक गाडीत बसले आणि त्यानंतर काही वेळातच गाडीचा अपघात झाला. यात सहा भाविकांना आपले प्राण गमवावे लागले.