बिहार : बिहारच्या पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसह मेहुणीवर गोळ्या झाडून स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली समोर येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दीपक कुमार असे आरोपीचे नाव आहे. दीपकच्या पत्नीचे नाव लक्ष्मी देवी आणि मेहुणीचे नाव गुडिया आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक हा मूळचा बिहार शरीफचा रहिवासी होता. सासरी असताना लक्ष्मीचे दिपकसोबत कौटुंबिक कारणावरून वारंवार वाद होत असे. यानंतर लक्ष्मी आपल्या माहेरी बाढ येथे आली. गेल्या दोन महिन्यापासून ती माहेरीच राहत होती. तिला तिच्या सासरच्या घरी राहायचे नव्हते. एके दिवशी दीपक हा लक्ष्मीला घ्यायला आला असता तिने पुन्हा सासरी येण्यास नकार दिला. यामुळे पती पत्नीमध्ये वाट वाढला. हा वाद मिटण्याऐवजी इतका वाढला की, दीपकने लक्ष्मीवर जागीच गोळ्या झाडल्या.
या घटनेत लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला. हा आवाज ऐकून लक्ष्मीची बहीण गुडिया तिला वाचवण्यासाठी आली असता दीपकने तिच्यावरही गोळ्या झाडल्या. त्यानंतर दीपकने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेत मेव्हुणी गुडिया गंभीर जखमी झाली असून तिच्यावर तिची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.