Crime News : नातेसंबंधांना काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. बिहारमधील भागलपूरच्या नवगचियामध्ये मामीवर असलेल्या प्रेमापोटी भाच्यानं माणूसुकीला काळिमा फसणार कृत्य केल्याचं उघड झालं आहे. मामीवर प्रेम करणाऱ्या भाच्यानं आपल्या पत्नीची विष पाजून हत्या केली असल्याचे समोर आले आहे. हत्या केल्या नंतर पत्नीचा मृतदेह त्याने कोसी नदीत फेकून दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा शोध लावला असून या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील नवगचिया पोलिसांना 5 जुलै रोजी जहांगीरपूर बैसी गावातून माहिती मिळाली होती की, गावातील रहिवासी मोहम्मद फयाज यानं पत्नी शबनम खातूनची हत्या करून तिचा मृतदेह कोसी नदीत फेकून दिला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून यासंदर्भात तपास केला. मोहम्मद फयाज आणि त्याच्या मामीने पत्नीच्या हत्येचा प्लॅन रचला. त्यानंतर त्यानं आपल्या पत्नीला ॲसिड पाजल्याचं तपासात उघड झालं आहे. पत्नीचा विष पिऊन मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह नदीत फेकून दिला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, आरोपी मोहम्मद फैयाजनं पोलिसांना सांगितलं की, त्याचे आणि त्याच्या मामीचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध आहेत. पत्नी शबनमनं दोघांच्या प्रेमाला विरोध केला. याच कारणावरुन आरोपी मोहम्मदला राग आला आणि त्यानं मामीसोबत मिळून पत्नीचा काटा काढण्यासाठी कट रचला. ठरल्याप्रमाणे दोघांनी आधी शबनमला बेदम मारहाण केली आणि नंतर तिला जबरदस्तीनं विष पाजलं. त्यानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आला.
हत्येनंतर आरोपीनं पत्नीचा मृतदेह नदीच्या जोरदार प्रवाहात फेकून दिला होता. अजुनपर्यँत पोलिसांना शबनम खातूनचा मृतदेह ताब्यात घेण्यात यश आलेलं नाही. स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीनं मृतदेहाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी मृत शबनमचा पती आणि त्याच्या मामीला अटक केली आहे.
एसडीपीओ ओम प्रकाश काय म्हणाले?
एसडीपीओ ओम प्रकाश यांनी सांगितलं की, समीमा खातून नावाच्या महिलेनं 5 जुलै रोजी रंगरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यामध्ये महिलेनं सांगितलं होतं की, तिच्या मुलीचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, मात्र तिच्या सुनेचं तिच्या जावयासोबत अनैतिक संबंध होते. मुलीचा याला विरोध असायचा. विरोधामुळे मामी आणि मुलगा दोघेही मुलीला मारहाण करायचे आणि पैशाची मागणी सुद्धा करायचे. दरम्यान, मुलीची हत्या झाली. पोलिसांनी मृताचा पती मोहम्मद फयाज आणि मामी रीना खातून यांना अटक केली असून चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.