मुंबई : माजी राज्यमंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षातील नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. एकूण तीन आरोपींनी भर रस्त्यावर त्यांना गोळ्या घातल्या असून यातील दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अद्याप तिसरा आरोपी फरार आहे. दरम्यान, याच तिसऱ्या फरार आरोपीचे नाव आता समोर आले असून हा आरोपी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे. शिवा असे त्या आरोपीचे नाव आहे.
‘तो’ स्क्रॅप डिलरकडे करत होता काम..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत सहाभागी असलेल्या तिसऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांनी तिसऱ्या व्यक्तीचे नाव शोधले आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या आरोपीची इतरही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या माहितीनुसार तिसरा आरोपी हा पुण्यात पाच ते सहा वर्षांपासून एका स्कॅप डिलरकडे काम करतो आहे. त्याने धर्मराज नावाच्या 19 वर्षीय आरोपीला काही महिन्यांपूर्वी पुण्यात बोलवून घेतलं होतं.
त्यानंतर हत्येची सुपारी देणाऱ्या व्यक्तीने शिवा आणि धर्मराज यांची गुरुमेल याच्याशी भेट घडवून आणली होती. गुरुमेल हा 23 वर्षांचा आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. याआधी त्याच्याविरोधात एक हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धर्मराज आणि गुरमेल यांच्या नावावर याआधी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
शिवा अद्याप फरार..
आता पोलीस या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या आरोपींचा शोध घेत असून पुण्यातील शिवा नावाचा तिसरा आरोपी सध्या फरार आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके पुणे तसेच परराज्यात रवाना झाली आहेत. या हत्या प्रकरणात आणखी एक आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस या आरोपीचाही शोध घेत आहेत.