पुणे : जेजुरी एमआयडीसीमधील बर्जर पेन्टच्या कंपनीमध्ये शुक्रवारी (ता.३०) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. त्यामध्ये एका कामगारचा मृत्यू झाला आहे तर दुसरा एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
रोहित जयवंत माने (वय. २८ रा. सुर्वे वस्ती, राख) असे स्फोटात मृत्यूमुखी झालेल्या कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, शुक्रवारी सायंकाळी (ता. ३०) रोजी ७ वाजण्याच्या सुमारास जेजुरी एमआयडीसीमध्ये असलेल्या बर्जर पेन्टच्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. कंपनीत अचानकपणे एकच गोंधळ उडाला. स्फोटात जखमी झालेला रोहित सुमारे ९० टक्के भाजल्याने त्यास तात्काळ पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. स्फोटामध्ये रोहितला त्याचा जीव गमवावा लागल्याने कंपनीतील कर्मचारी संतप्त होते.
दरम्यान, रोहित माने याच्या कुटुंबियांना कंपनीने मदत द्यावी म्हणून कामगारांनी आंदोलन केले. कंपनीच्या बेजबाबदार अधिकार्यांवर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा, गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत रोहित मानेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. दरम्यान, प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.