संदीप बोडके
थेऊर , ता. १३ : थेऊरच्या भ्रष्ट व लाचखोर मंडल अधिकारी जयश्री कवडे यांच्या कार्यालयातील दोन खाजगी इसमांना ७ हजारांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यामुळे हवेली महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
योगेश कांताराम तातळे (वय २२, खाजगी संगणक ऑपरेटर रा. चौधरी पार्क, बाबु कदम चाळ, दिघी) व विजय सुदाम नाईकनवरे (वय ३८ वर्ष, व्यवसाय एजंट, रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर लोकसेविका जयश्री कवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
थेऊर मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची वारंवार पोलखोल “पुणे प्राईम न्यूज” ने केलेली होती, मात्र प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्यांची पाठराखण करत होते. त्यामुळे त्यांना एसीबी कडून झालेली अटक हे छोटंसं हिमनगाचे टोक असून त्याची व्याप्ती वरिष्ठ अधिका-यापर्यत पोहोचत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
थेऊर मंडल अधिकारी जयश्री कवडे यांनी तलाठी व सर्कल कार्यालयातील जुन्या खासगी लोकांची खांदेपालट करत बेकायदेशीरपणे लाच स्वीकारण्यासाठी खाजगी ‘शूटर’ ची नेमणूक केल्याची चर्चा होत होती. मात्र आता त्यांच्या खाजगी शूटरलाच अटक केल्याने तलाठी व थेऊर मंडल अधिकारी कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची लक्तरे निघाली आहेत.
लोणी काळभोर तलाठी कार्यालय, थेऊर तलाठी कार्यालय व थेऊर मंडल अधिकारी कार्यालय यामधील चुकीच्या कारभाराचा “पंचनामा” व शेतक-यांकडून लाच मागितलेला व्हिडिओ व औडिओ क्लिप चा पुरावा “पुणे प्राईम न्यूज” ने प्रशासनापुढे व जनतेपुढे मांडलेला होता. तसेच त्याबाबत नागरिकांनी महसूलच्या वरिष्ठ कार्यालयात व एसीबी कार्यालयात अनेक तक्रारी दाखल केलेल्या होत्या. मात्र कागदी घोडे नाचवण्यापुढे वरिष्ठ अधिकारी काहीही करत नसल्याने नागरिकांमध्ये महसूलच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आजीच्या आईच्या वडीलांचे नावे मौजे कोलवडी, येथे असलेल्या शेतजमीनीचे ७/१२ उता-यावरील नाव कमी झाल्याचे दिसुन आल्याने, त्या नावाची नोंद पुर्नःस्थापीत करण्यासाठी तक्रारदार यांची आजी व तिच्या बहिणींनी हवेली तहसिलदार यांच्याकडे रीतसर अर्ज केला होता. सदर अर्जावर तहसिलदार यांनी, तक्रारदार यांच्या आजीच्या आईच्या वडिलांच्या नावाची ७/१२ उता-यावर नोंद करण्यासाठी गाव कामगार तलाठी कोलवडी व मंडल अधिकारी थेऊर यांना आदेश दिले होते.
याबाबत गावकामगार तलाठी यांनी घेतलेल्या फेरफार नोंदीप्रमाणे ती नोंद मंजुर करण्यासाठी तक्रारदार हे मंडल अधिकारी थेऊर कार्यालय येथे लोकसेविका जयश्री कवडे यांना भेटले असता, लोकसेविका जयश्री कवडे यांनी खाजगी इसम विजय नाईकनवरे यास भेटण्यास सांगितले. त्यानंतर विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे फेरफार नोंदीप्रमाणे आजीच्या आईच्या वडीलांची नोंद मंजुर करण्यासाठी लोकसेविका जयश्री कवडे यांच्याकरीता १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता, थेऊर मंडल अधिकारी कार्यालयामध्ये खाजगी इसम योगेश तातळे व विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडून फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी लोकसेविका जयश्री कवडे यांच्यासाठी तडजोडीअंती ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. व खाजगी इसम विजय नाईकनवरे याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तर लोकसेविका जयश्री कवडे यांनी खाजगी नाईकनवरे याच्या लाच मागणीस व लाच रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले. म्हणुन खाजगी इसम तातले व नाईकनवरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जयश्री कवडे व त्यांचे दोन खाजगी इसम योगेश तातळे व विजय नाईकनवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.