Big Breaking News लोणी काळभोर : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून झालेल्या इंधनचोरी प्रकरणातील प्रमुख इंधनमाफिया प्रविण मडीखांबे व या प्रकरणात प्रविणला सहकार्य करणारा कंपनीतील सेन्सर व व्हॉल्व्ह ऑपरेटरसह पाच जणांना लोणी काळभोर पोलिसांनी आत्तापर्यंत अटक केली आहे. (Big Breaking News)
प्रविण मडीखांबेसह या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींनी एकीकडे आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील इंधन चोरीच्या विक्रीतून आलेला पैशाचा वाटा कोणाला किती मिळाला याची कबुली पोलिसांना दिली असली तरी, दुसरीकडे मात्र हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आळंदी म्हातोबाची येथे पाईपलाईन फोडून नेमकी किती लिटरची इंधन चोरी झाली, याबद्दल ‘आळीमिळी गुपचिळी’चे धोरण स्वीकारले आहे. या धोरणामुळे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या डेपोमधील अधिकाऱ्यांच्या बद्दल संशयांचे वातावरण निर्माण झाले आहे. (Big Breaking News)
आळंदी म्हातोबाची हद्दीतील डोंगरात २५ जुलैला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून इंधन चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले होते. यात पोलिसांनी चार दिवसांपूर्वी प्रविण मडीखांबे, विशाल धायगुडे व बाळू चौरे या तिघांना अटक केली होती.
या तिघांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी प्रविण व त्याच्या सहकाऱ्यांना जमिनीखालील पाईपलाईन फोडण्यापासून ते पाईपलाईनमधून इंधन चोरी करण्यापर्यंत मदत करणाऱ्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या लोणी काळभोर येथील डेपोमधील कंपनीचा सेन्सर व व्हॉल्व्ह ऑपरेटर संकेत शेंडगे याला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात यश मिळवले होते. अटक झालेल्या आरोपींकडे आत्तापर्यंत केलेल्या प्राथमिक चौकशीत लोणी काळभोर पोलिसांना इंधन चोरीच्या विक्रीतून आलेला पैशाचा वाटा कोणाला, किती मिळाला व त्या पैशाची विल्हेवाट कुठे लावली याची ठोस माहिती पोलिसांना मिळालेली आहे. (Big Breaking News)
कंपनीतीलच बडे अधिकारीही सहभागी?
पण, ज्या कंपनीची पाईपलाईन फोडून प्रविण मडीखांबे व त्याच्या सहकाऱ्यांनी पेट्रोल-डिझेल चोरले, त्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नेमकी किती लिटरची इंधन चोरी झाली याबद्दल आठ दिवसानंतरही तोंड उघडलेले नाही ही बाब खटकणारी आहे. यामुळे कंपनीत काम करणाऱ्या सेन्सर व व्हॉल्व्ह ऑपरेटरसह कंपनीतीलच बडे अधिकारीही सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रविण मडीखांबेला सहकार्य करणाऱ्या संकेत शेंडगे याला अटक केली असली तरी या चोरीत सहभागी असलेला संकेतचा कंपनीमधील आणखी सहकारी फरार झाला आहे. त्याच्या अटकेनंतर मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. (Big Breaking News)
तरडेसारखीच ही देखील इंधनचोरी दडपणार का?
पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक शाखेने आठ महिन्यांपूर्वी हवेली तालुक्यातील तरडे गावातील भारत पेट्रोलियम कंपनीतून बाहेर पडणाऱ्या टँकरमधून होणारी मोठी इंधन चोरी पकडली होती. यात 25 हून अधिक टॅंकर सीलही करण्यात आले होते. या टॅंकरच्या माध्यमातून 15 नंबर, थेऊरफाटा येथील दोन इंधन माफियासह व प्रविण मडीखांबे अशा तिघांनी भारत पेट्रोलियम कंपनीतून कोट्यवधी लिटर पेट्रोलची चोरी केल्याचा अहवाल दिला होता. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना तोंडघशी पाडले होते. हा प्रकार ताजा असतानाच, आळंदी म्हातोबाची हद्दीतील इंधन चोरीबाबत हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांची भूमिकाही तडजोड करणारी असल्याचे जाणवू लागले आहे. (Big Breaking News)
8 दिवसानंतरही कंपनीतील अधिकारी शांतच…!
लिटरच्या हजाराव्या भागाबद्दल माहिती मिळणारे तत्रंज्ञान हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या डेपोत वापरले जात असताना आळंदी म्हातोबाची येथे पाईपलाईन फोडून नेमकी किती लिटरची इंधन चोरी झाली हे आठ दिवसानंतरही कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगता येत नाही, ही बाब सर्वसामान्य नागरिकांच्या आकलनापलीकडची असल्याचे दिसून येत आहे. (Big Breaking News)
कंपनीकडून घेतला जाणार आढावा
याबाबत बोलताना लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण म्हणाले, ‘आळंदी म्हातोबाची हद्दीतील डोंगरात २५ जुलैला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून नेमकी किती लिटर इंधन चोरी झाली याबद्दल कंपनीने काहीही माहिती दिलेली नाही ही बाब खरी आहे. आरोपी इंधन चोरीच्या विक्रीतून आलेला पैशाचा वाटा कोणाला किती मिळाला व त्या पैशाची विल्हेवाट कुठे लावली याची ठोस माहिती पोलिसांना देत असताना कंपनी मात्र चोरीच झाली नाही, असा दावा करत आहे. याबाबत पोलिसांनी कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाला पत्र दिले असून, त्यांनी एक टीम पाठवून चोरीच्या एकूणच घटनेबाबत व चोरी किती झाली याबाबतचा आढावा घेतला जाणार असल्याचे पोलिसांना कळवले आहे. (Big Breaking News)