भिगवण : भिगवण येथील हॉटेल व्यवसायिकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण येथील प्रसिद्ध मासे खानावळीचे मालक यांच्यावर हा हल्ला झाला. पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड हद्दीत हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. दौंड हद्दीतील गुन्हा असला तरी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी तातडीने हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडील कोयता जप्त केला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती दौंड पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. हल्लेखोर एकटाच होता की त्याचे साथीदार सोबत होते, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. जखमी हॉटेलमालक यांना भिगवण येथील यशोधरा या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच पुढील उपचारसाठी बारामती रुग्णालयात नेण्यात आले.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता हल्लेखोराला धारदार शस्त्रासह ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जखमी हॉटेलमालक यांची प्रकृती स्थिर असून, भिगवण शहरात शांतता कायम असल्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन केले आहे.