पुणे : पुण्यातून एक मोठी अपघाताची बातमी समोर येत आहे. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने तब्बल ८ वाहनांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना कोंढवा येथील खडीमशीन चौकात आज गुरुवारी (ता.१०) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात १ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ५ ते ७ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
प्रशांत कृष्णा चोरे (वय-४३, रा. धनकवडी, पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर तेजस रामभाऊ काकडे (वय-२२, रा मुक्काम पोस्ट साबळा, तालुका केज, जिल्हा बीड) असे ब्रेक फेल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस काकडे हे चालवीत असलेल्या मालवाहतुकीचा कंटेनरचा (mh 14 gd 6919) ब्रेक फेल झाला होता. काकडे यांचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनरने खडीमशीन चौकात समोरील ८ वाहनांना जोरदार धडकदिली. या अपघातग्रस्त वाहनांमध्ये चार दुचाकी, दोन कार व दोन टेम्पोंचा समावेश आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर ५ ते ७ जण गंभीर जखमी आहेत.
या घटनेची माहिती मिळताच, कोंढवा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ७ जखमींना तातडीने भारती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. व घटनास्थळावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, या अपघातात एका स्कूलबसही समावेश आहे. सुदैवाने स्कूल बसमधील विद्यार्थी सुरक्षित आहेत, मात्र चालक किरकोळ जखमी झाला आहे.