जीवन सोनवणे
खंडाळा. ता . १७ : पुणे – सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात कंटेनरने दुचाकीला चिरडल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.१७) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील पुरुष व महिलेचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खंबाटकी घाटातील बोगद्यानंतर दुसऱ्या वळणाजवळ असलेल्या एस. कॉर्नरच्या समोर हा अपघात झाला आहे. अज्ञात कंटेनर चालकाचे गाडीवर चे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
विकेंड तसेच शनिवार – रविवार दोन्ही दिवस लागून आलेल्या सुट्टीमुळे व गणेशोत्सवामुळे गणेशभक्त तसेच चाकरमानी मोठ्या संख्येने पुणे-मुंबईहून गावी निघाले आहेत. त्यातच हा अपघात झाल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. पोलिसांनी तत्काळ रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही. दोघांचे मृतदेह तत्काळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.