कोल्हापूर : कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीत असलेल्या केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. या कंपनीतून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडत असून सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये ही आग लागली आहे.
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली आहे. या आगीचे धुराचे लोट राष्ट्रीय महामार्गावरून दिसत आहेत. यावरून आगीची भीषणता लक्षात येते. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, कर्मचारी पहिल्यांदाच बाहेर पडल्याचे समजते. मात्र, याबाबत अजून कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. जीवितहानी टाळण्यासाठी ॲम्बुलन्स आग लागलेल्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत.
गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत. केमिकल कंपनीत आग लागल्याने इतर कंपन्यांकडे आग पसरू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.