लोणी काळभोर, (पुणे): ऍसिडचे ड्रम पडून लागलेली आग विजवण्यासाठी अग्निबंबाचा वापर केल्याने विषारी वायू तयार झाल्याची धक्कादायक घटना भांडगाव (ता. दौंड) येथील ”वेस्टन मेटल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीत गुरुवारी (ता.28) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या विषारी वायुमुळे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर ९ जण गंभीर जखमी आहेत.
अमोल सूरज चौधरी (वय-२८, रा.खोर, ता. दौंड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर पंकज जाधव (वय 24) सुयांश सेन (वय 21) भगवान सिंग (वय 35) रमेश राज वय – 23) सनी देव (वय – 23) गणेश नाईकनवरे (वय-28) राजू शेंडगे (वय-57) प्रवीण जाधव (वय 25), सय्यद मुबारक वय -35) अशी 9 जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत काम करताना कामगारांना ऍसिड लागत असल्याने त्यांनी ड्रम फोडले होते. मात्र हे ड्रम अचानक पलटी झाले. हे ड्रम पलटी झाल्याने कंपनीत अचानक आग लागली. हि आग विझविण्यासाठी कामगारांनी तातडीने अग्निबंबाचा वापर केला. आणि तब्बल अडीज तासाच्या प्रयत्नानंतर हि आग विझविण्यात यश आले.
या आगीच्या दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणात विषारी धूर तयार झाला होता. हा धूर कामगारांच्या नाकातोंडात गेला होता. त्यावेळी कामगारांना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. मात्र संध्याकाळी कामगार घरी गेल्यानंतर १० कामगारांना श्वसनाच्या त्रास होऊ लागला. यातील अमोल चौधरी याचा मृत्यू झाला आहे. तर ४ कामगार अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर चार कामगार सुस्थितीत असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या घटनेला १८ तास उलटून देखील अद्यापही कंपनीच्या कडून पोलिसांना कळविण्यात आलेले नाही. अथवा कोणतीही तक्रार दिलेली नाही. यामुळे कंपनी काय साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सविस्तर वृत्त थोड्या वेळातच