उरुळी कांचन (पुणे): सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बेकायदेशीरीत्या वाळूचे उत्खनन होत असलेल्या ठिकाणी उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद यांच्या पथकाने छापा टाकुन, चार मोठ्या वाहणांच्यासह सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोरतापवाडी आळंदी म्हातोबाची गावच्या सिमेवर सोमवारी दुपारी करण्यात आली आहे.
हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांना सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची सीमेवर मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात असल्याची गोपिनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद व नायगावचे तलाठी व पंच कैलास चोरघे, व राहुल चौधरी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, एक जेसीबी, तीन हायवा एम. एच. १२ एम. व्ही. २७९४. एम. एच. १४ ए.एच. ६०१५ व एम. एच. १२ एल. टी. ४०७७ हायवा वाळूने भरलेले दिसून आले. यामध्ये प्रत्येकी ४ ब्रासप्रमाणे १२ ब्रास वाळू भरलेल्या अवस्थेत आढळून आली. यावेळी सदर घटनेचा पंचनामा करून वाळू तीन हायवा एक जेसीबी असा सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा :
महसूल विभागाने केलेल्या या कारवाईबाबत पूर्व हवेलीत एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सदरची कारवाई करताना महसूल विभागावर प्रतिष्ठित नागरिकांनी दबाब आणण्याचा प्रयत्न केला मात्र महसूल विभाग कोणत्याही दबावाला बळी न पडता मोठी कारवाई केल्याने पूर्व हवेलीतून महसूल विभागाचे कौतुक नागरिक करीत आहेत.
दरम्यान, उरुळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर, कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, शिंदवणे, तरडे, व वळती या भागातही राजरोसपणे मागील काही दिवसापासून रातोरात वाळू उपसा सुरु आहे. या ठिकाणी होत असलेल्या वाळू उपश्यावर कारवाई कधी होणार याकडे या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.