पुणे : खासगी कंपन्यांना कामगार उपलब्ध करुन देणाऱ्या ठेकेदाराकडे प्रतिमाह ४० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका माथाडी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
ओंकार रमेश हिंगे (वय २३, रा. शिवतेजननगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी खासगी कंपनीतील एका कर्मचाऱ्याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खासगी कंपन्यांना कामगार उपलब्ध करुन देण्याचा व्यवसाय आहेत. त्यांनी अप्पर इंदिरानगर- गंगाधाम रस्ता परिसरात व्यावसायिकांना कंपनीकडून कामगार उपलब्ध दिले आहेत. आरोपी हिंगे याने तक्रारदाराला काही दिवसांपूर्वी भेटला. मी माथाडी संघटनेचा पदाधिकारी आहे. या भागात काम करायचे असेल तर माझ्या संघटनेकडून सुचविण्यात आलेल्या कामगारांना काम द्यावे लागेल. तसेच दरमहा ४० हजार रुपये एवढा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी हिंगेने तक्रारदाराला दिली होती.
त्यानंतर तक्रारदार यांनी आरोपी ओंकार हिंगे याच्याविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजकुमार बरडे व त्यांच्या पथकाला आरोपीला पकडण्यासाठी सूचना दिल्या.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी ओंकार हिंगे याला सापळा रचून अटक केली आहे. आणि आरोपीकडे अजून अशा प्रकारे खंडणी मागण्याचे आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. तरी, अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर बिबवेवाडी पोलीस ठाण्याशी संपक करावा. असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी केले आहे. तरी, पुढील तपास सहायक निरीक्षक बरडे करीत आहेत.