जीवन सोनावणे
भोर, (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून बिंगो या ऑनलाईन गेमने आपले जाळे वाढवले होते. त्या संदर्भात ‘पुणे प्राईम न्यूज’ने बातमी दिली होती. या बातमीची गंभीर दखल घेत राजगड पोलिसांनी सापळा रचून बिंगो अड्यावर छापा टाकला. त्यामध्ये व्यवसायचालक मनोज सुरेश रवळेकर (वय ३३, रा. सांगवी भाटघर ता. भोर जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंगो ऑनलाईन गेममुळे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात दिसून आल्या आहेत. त्यात किकवी (ता. भोर, जि. पुणे) गावच्या हद्दीतील एका बिल्डिंगमधील गाळ्यामध्ये गेम खेळला जात असल्याची माहिती मिळाली.
टेबलवर फन ऍप (बिंगो) यामध्ये एक रुपयाला 35 रुपये याप्रमाणे आकडे लावले जातात. आरोपी मनोज रवळेकर हा बेकायदा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी टॅबवर फन अॅप (बिंगो) वर पैसे लावून जुगार खेळत होता. त्या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले.
दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई केली. यामध्ये संशयित आरोपी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, पोलिस हवालदार अजित माने, भगीरथ घुले यांनी केली.