सागर जगदाळे
भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर चालकांना अडवून मारहाण करून लुटणाऱ्या दोन आरोपींना भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शुभम प्रकाश जाधव (वय-२१, रा. काळेगाव, ता. अहमदपुर, जि. लातूर), व वैभव व्यंकट सांगुळे (वय-२१, रा. बैंक कॉलनी अहमदपुर, जि. लातुर) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन मोटारसायकल, एक मोबाईल असा ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास डाळज नंबर १ ग्रामपंचायत हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर फिर्यादी यांना हाताने मारहाण करून मोटारसायकल व मोबाईल असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून घेऊन गेले. तसेच भिगवण ग्रामपंचायत हद्दीतून एक मोटारसायकल चोरी गेली होती. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथक यांना मार्गदर्शन केले. त्यानुसार सदर गुन्हयातील अज्ञात चोरटे यांनी अशाच प्रकारे लातुर ग्रामीण पोलीस स्टेशनचे हददीत पण गुन्हा केल्याची माहीती मिळाली. गुन्हे शोध पथक यांना सदर गुन्हयांचे तपासकामी लातुर या ठिकाणी पाठविण्यात आले.
दरम्यान, भिगवण पोलीस स्टेशनचे पथक व लातुर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक या दोघांची संयुक्तरित्या सखोल तपास करून वरील दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दोन्ही गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली. सदर आरोपींकडून पोलिसांनी दोन मोटारसायकल, एक मोबाईल असा ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, विनायक दडस पाटील, पोलीस अंमलदार विजय लोडी, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, यांच्या पथकाने केली आहे.