पुणे : लष्करात वरिष्ठ अधिकारी असल्याची खोटी बतावणी करुन भामट्याने महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बोपोडी (पुणे) परिसरात नुकतीच घडली आहे. याप्रकरणी एकाच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनीलकुमार मिना (वय २५, रा. कुंदनकुशलनगर, मानाजीबाग, बोपोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी सुनीलकुमार मिना या दोघांची ओळख होती. आरोपीने फिर्यादी यांनी लष्करात अधिकारी असल्याची खोटी बतावणी करुन महिलेशी जवळीक केली. तसेच फिर्यादी यांना बनावट ओळखपत्र दाखवून जाळ्यात ओढले. महिलेच्या मोबाइलमधील छायाचित्रे स्वत:च्या मोबाइलमध्ये घेतली.
त्यानंतर फिर्यादी यांना त्या छायाचित्रांचा गैरवापर करुन समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. महिलेने त्याच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर त्याने महिलेचा पाठलाग सुरू केला. तिला रस्त्यात अडवून विनयभंग केला. महिलेला शिवीगाळ करुन धमकावले.
दरम्यान, याप्रकरणी फिर्यादी यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सुनीलकुमार मिना याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ करीत आहेत.