बारामती : ओपीडी संपवून घरात जेवणासाठी गेलेल्या डॉक्टरांनी घराचा दरवाजा लवकर उघड्ला नाही म्हणून रुग्णाच्या कुटुंबियांतील चौघांनी डॉक्टरला व त्याच्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघकीस आली आहे.
आनंदा उर्फ अनिल संभाजी जगताप, त्याचा पोरगा विश्वजीत आनंदा जगताप, भूषण आनंदा अनिल जगताप आणि राजेंद्र शंकर जगताप व अशोक शंकर जगताप ( सर्व रा. सांगवी, ता. बारामती) असे मारहाण करणाऱ्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी युवराज शिवाजी गायकवाड यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज गायकवाड हे डॉक्टर असून त्यांचा सांगवी येथे साई क्लिनिक या नावाने दवाखाना आहे. तसेच दवाखान्यातच ते राहण्यास आहेत. ६ सप्टेंबर रोजी रात्री त्यांनी त्यांचे पेशंट तपासून दवाखाना बंद केला व सव्वानऊच्या सुमारास घरामध्ये गायकवाड हे जेवण करीत होते.
त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा जोरजोरात वाजवून कोणीतरी खिडकीची काच फोडली. जेवण करीत असताना लवकर दरवाजा उघडला नाही म्हणून ही काच फोडली होती. अखेर डॉक्टरांनी दरवाजा उघडला, तर घराबाहेर आनंद उर्फ अनिल जगताप, विश्वजीत जगताप, अशोक जगताप, भूषण जगताप यांनी गायकवाड यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली.
दरम्यान, गायकवाड यांचा मुलगा विराज हा तेथे आला व वडीलांना का मारता असे विचारल्यानंतर त्याला सुध्दा वरील चौघांनी मारण्यास सुरवात केली. डॉक्टर गायकवाड यांच्या पत्नीलाही या चौघांनी मारहाण केली. त्यामुळे गायकवाड यांनी माळेगाव पोलिसांकडे तक्रार दिली त्यानुसार चौघांवर पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.