पुणे : नवरा बायकोचे भांडण सोडवताना पतीचा राग अनावर झाला आणि त्याने महिला कॉन्स्टेबल आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये घडला. हा प्रकार सोमवार (ता.३१ ) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला असून दाम्पत्याने पोलीस ठाण्यात चांगलाच गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करताना नवऱ्याला अटक केली.
सुनील दनाने आणि नीता सुनील दनाने (रा. कळस, विश्रांतवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नवरा बायकोची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अस्मिता सचिन लावंड यांनी फिर्याद नोंदविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सुनील दनाने आणि नीता दनाने यांची रस्त्यावर भांडण सुरू होते. या दोघांचे रस्त्यावर चालू असलेले भांडण मिटवण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी आरोपी निता दनाने यांनी त्या ठिकाणी येऊन पोलीस अंमलदार कक्षातून अजय रिठे यांना ओढून घेऊन जाऊ लागल्या. यावेळी पोलीस शिपाई खेडकर यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. नीता दनाने हिने त्यांना हाताने मारहाण केली. तर आरोपी सुनील दनाने याने शिवीगाळ केली.
दरम्यान, आरोपी सुनील दनाने याने पोलीस उपनिरीक्षक मगदूम यांच्या हाताचा अंगठा पिरगाळला आणि पोलीस ठाण्यातील खिडकीच्या काचेवर डोके आपटायला सुरुवात केली. त्यानंतर काचेचा तुकडा हातात घेऊन तो खाली पळत सुटला होता.
या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी संबंधित नवरा बायको विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुनील दनाने याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम करीत आहेत.