पुणे : पुण्यात सोसायटीच्या कॉमन एरिया वापरण्याच्या कारणावरुन एका तरुणीला मारहाण करुन तिच्या अंगावरील कपडे फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वानवडी येथील केदारीनगर येथे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीत कौर, क्रिस्टोफर जॉन बॉस्को, श्वेता उमेश शेट्टी, गजेंद्र सिंग गोविंदसिंग, सचिन कदम, जयेश गिरीश माली आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि मुलगी हे दोघेही एकाच सोसायटीत राहतात. त्यामुळे या सगळ्यांमध्ये ओळखी होती. टेरेसवर मुलगी फिरत असताना मुलांनी या मुलीला सोसायटीचा कॉमन परिसर वापरण्यास मनाई केली. याच कारणावरुन मुलीला शिवीगाळ केली आणि तिला हाताने मारहाण केली.
एवढंच नाही तर आरोपीने थेट या मुलीच्या अंगावरचे कपडे फाडले आणि तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्या मोबाईलच देखील मोठं नुकसान केलं आहे. हा सर्व प्रकार पाहून मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकारची चौकशी करुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.