पुणे : जंगली महाराज रस्त्यावर एका वकिलाला ऑडी कारमध्ये बसलेल्या इसमाला पत्ता विचारणे चांगलेच महागात पडले. ऑडीमध्ये बसलेल्या व्यक्तीने श्रीमंत लोकांना पत्ता विचारता का ? असे म्हणून त्यांना मारहाण केली. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर सुभद्रा हॉटेलच्या समोर हा सर्व प्रकार घडला.
याप्रकरणी विशाल शंकर सोनवणे (वय ४२, तिरुपती टाऊनशिप, भैरवनगर, धानोरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार एमएच १४ आरएफ ६६८५ या ऑडी कारवरील चालकाच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांनी डेक्कन परिसरातील सुभद्रा हॉटेल समोर थांबलेल्या व्यक्तीला सोनवणे यांनी एका क्लासचा पत्ता विचारला . पत्ता विचारल्याचा राग मनात धरून ऑडी चालकाने ‘तुम्हाला समजते का, तुम्ही कोणाला पत्ता विचारत आहात, आम्ही ऑडी चालवणारे लोक आहोत’ असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली.
त्यानंतर कार वेगाने घेऊन जात असताना गाडीचे चाक फिर्यादींच्या पायावरून नेले. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.