गोरख जाधव
Baramati News : डोर्लेवाडी, (बारामती) : बारामती-वालचंदनगर रोडवर दुचाकी व हायवा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. २९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
हायवाने पाठीमागून दुचाकीला धडक
सतीश रामदास पवार (वय-३८ व त्यांचा मुलगा आर्यन सतीश पवार (वय- १२ रा. दोघेही आसू ता. फलटण जि. सातारा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या बापलेकाची नावे आहेत.
स्थानिक नागरिकांनी मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पवार व त्यांचा मुलगा हा बारामती-वालचंदनगर रस्त्यावरून दुचाकीवरून घरातून बारामतीकडे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. यावेळी मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हायवाने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली.
या झालेल्या अपघातात वडील सतीश पवार यांचे जागेवरच निधन झाले. तर आर्यन याच्या डोक्याला मोठ्या प्रामाणात जखमा झाल्या होत्या. त्याला तत्काळ एका खाजगी रुगणालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी बारामती ग्रामीण पोलीस दाखल झाले आहेत. पंचनामा सुरु असून पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश पवार तपास करीत आहेत.
दरम्यान, अशाच पद्धतीच्या हायवाने मागील महिन्यात २९ जुलैला लहान मुलाला चिरडल्याची घटना सोनगाव (ता. बारामती) घडली होती. परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम, वाळू उपसा होत असल्याच्या चर्चा नागरिक करून करून लागले असून महसूल प्रशासन व पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थनिक नागरिक करू लागले आहेत. त्यामुळे अशा हायवा चालकांवर पोलीस व महसूल प्रशासन काय कारवाई करतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
रोडवर गतिरोधक टाकण्याची वारंवार मागणी..
बारामती वालचंदनगर रोडचे काही दिवसापर्वी काम पूर्ण झाले आहे. यामुळे या रोडवरती वेगाने वाहने वाहत आहेत. या रोडवर अनेक वेळा अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत. या रोडवर गतिरोधक टाकण्याची मागणी सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने अनेक वेळा संबंधित रोडच्या बांधकाम अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार देखील करण्यात आले आहेत.
संबंधित बांधकाम अधिकारी व रोडचे कॉन्ट्रॅक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.
मात्र जाणीवपूर्वक अधिकारी गतिरोधक बसवण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत, यामुळेच वारंवार अपघात घडत आहे. याला सर्वस्वी संबंधित बांधकाम अधिकारी आणि या रोडचे कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असून त्यांच्यावरच आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी झारगडवाडीचे सरपंच अजित बोरकर यांनी केली आहे.