Baramati News : बारामती, (पुणे) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि तिचा सक्तीने गर्भपात केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीने पोलीस कोठडीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. 28) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे पोलीस प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली असून, कोठडीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. Baramati News

रवींद्र आनंद गार्डी असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. रवींद्र याच्यावर १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आणि त्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा गंभीर आरोप होता. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती, त्यानुसार तो सध्या पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये होता. Baramati News
सोमवारी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना रवींद्र कोठडीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने कोठडीतच उपलब्ध असलेल्या साहित्याच्या मदतीने आपले जीवन संपवले. हा प्रकार लक्षात येताच पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. Baramati News
दरम्यान, गंभीर गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांच्या पहाऱ्यात असताना इतके टोकाचे पाऊल नेमके कशामुळे आणि कधी उचलले, याबाबत आता परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याला भेट दिली असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु आहे. Baramati News







