बारामती : रस्ता ओलांडताना दुचाकी घासल्याच्या वादातून बारामती येथील एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार काल गुरुवारी (ता.३) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. याप्रकरणी आठ अज्ञातांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या हल्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
गणेश जाधव असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ऋत्विक जीवन मुळीक (वय २१, रा. कुंभरकरवस्ती, वंजारवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार बारामती तालुका पोलीस ठाण्यात शुभम राजपुरे व तुषार भोसले यांच्यासह आठ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाच जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋत्विक मुळीक व त्याचे मित्र तेजस पवार, स्वप्निल भोसले, स्वी माने हे पेन्सिल चौक ते जळोची रस्त्यावरील चाय चस्का दुकानात गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास गेले होते. चहा पिऊन तो रस्ता ओलांडत असताना, एक दुचाकी फिर्यादीला घासून गेली. तेव्हा फिर्यादीने गाडी नीट चालवं, माणसांना मारतो का, अशी विचारणा केली.तेव्हा आरोपींनी दुचाकी माघारी आणून त्यातील एकाने ऋत्विक मुळीकला लाथाबुक्यांनी मारहाण केली. मुळीकच्या मित्रांनी त्यांची भांडणे सोडवली, परंतु यावेळी साथीदारांना ठार मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, तेजस पवार याच्याकडून दुचाकीवरून कट मारणारा मुलगा हा तुषार भोसले असून तो शुभम राजपुरे याचा साथीदार आहे. तसेच त्यांची बारामती शहर, एमआयडीसी परिसरात दादागिरी असल्याचे समजले. या घटनेनंतर फिर्यादी मित्रांसह तेथून निघून गेले.
त्यानंतर ऋत्विक मुळीक ही बाब गणेश जाधव याला सांगण्यासाठी ते भिगवण रस्त्यावर सहयोग सोसायटीजवळ रिलायन्स पेट्रोलपंपावर आले. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ते गणेश जाधव याला चाय चस्का दुकानासमोर घडलेली घटना सांगत होता. याच दरम्यान तेथे चार ते पाच दुचाकी आल्या. एका दुचाकीवर शुभम राजपुरे बसला होता. तेव्हा शुभम राजपुरे म्हणाला. ‘तु कोण आमच्यावर दादागिरी दाखविणारा, बारामतीत माझीच दादागिरी चालणार, माझ्याशी पंगा घेणारा बारामतीत अजून पैदा व्हायचा आहे’ असे म्हणत पिस्तुलातून गणेश जाधव याच्या दिशेने दोनवेळा फायरिंग केली होती. दुसऱ्या वेळेस केलेल्या फायरिंगमध्ये एक गोळी गणेशच्या पोटात लागली.
दरम्यान, हि गोळी गणेश जाधव याच्या पोटाजवळ लागली. फिर्यादी व अन्य मित्रांनी जाधव याला रक्तबंबाळ अवस्थेत बारामती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पाच जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र यातील मुख्य आरोपी शुभम राजपुरे व तुषार भोसले हे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी एकूण सहा पथके तयार करून शोधमोहीम आखली आहे.