बारामती : बारामतीमध्ये शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहार सुरु असताना गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निंबुत येथे हा गोळीबार झाला आहे. गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांकडून गौतम शहाजीराव काकडे व गौरव शहाजीराव काकडे या दोघा भावांसह तीन अनोळखी तरूणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघेही सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांची मुले आहेत. या प्रकरणाची अंकिता रणजित निंबाळकर (वय २३) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. निंबुत तेथील गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांचा शर्यतीचा बैल खरेदी केला होता. हा खरेदी केलेला बैल निंबाळकर हे पुन्हा परत मागत होते. मात्र यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. रणजीत निंबाळकर हे काल (गुरुवारी) मोठ्या प्रमाणात लोक घेऊन गौतम काकडे यांच्या घरी जबरदस्तीने बैल नेण्यासाठी आले होते.
यावेळी त्यांचा काकडे आणि निंबाळकर यांच्या शाब्दीक चकमक होऊन वाद झाला. या वादातून गोळीबार झाला आहे. या गोळीबारामध्ये रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत. रणजित यांना बारामतीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी गौरव काकडे व आणखी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. वडगाव निंबाळकर पोलिस पुढील तपास करत आहेत