बारामती : बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी (2 मार्च)रोजी पोलीसांना गोपनीय बातमीदाराकडुन एका व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या व्हाट्सअॅप स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो ठेवून धार्मिक तेढ निर्माण होईल,असा आक्षेपार्ह मजकूर ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्ती व त्या व्यक्तीचा मोबाईल ताब्यात घेतला. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा फोटो व आक्षेपार्ह मजकूर आढळून आला. त्यानंतर संबंधित व्यक्तीला प्रतिबंधक उपाय म्हणून येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
अश्या कृत्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन बारामती शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करिता बारामती शहरचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी त्या व्यक्तीच्या विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिते प्रमाणे प्रस्ताव तयार केला. त्यानंतर तो अप्पर पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी गणेश बिरादार यांना सादर केला. यावर सुनावणी होऊन त्या व्यक्तीची कृती धार्मिक तेढ निर्माण करणारी असल्याची खात्री झाली. त्यानंतर प्रतिबंधक उपाय योजना म्हणून त्याला योग्य व लायक जामिनदार न मिळाल्याने त्या इसमाची 14 दिवसांकरीता येरवडा कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे पंकज देशमुख, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.